0



अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उत्तर कोरियाच्या हुकूमशहाच्या पातळीपर्यंत अधःपतन झाले आहे, अशी टीका जर्मनीतील चान्सलरपदाच्या एका उमेदवार नेत्याने केली आहे. ट्रम्प हे बेजबाबदार व्यक्ती असल्याचीही कठोर टीका त्यांनी केली आहे.

झेडडीएफ या जर्मन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मार्टिन शुल्झ यांनी ही टीका केली आहे. शुल्झ हे सोशल डेमोक्रॅट्स पक्षातर्फे चान्सलरपदाचे उमेदवार आहेत. “व्हाईट हाऊसमधील हा बेजबाबदार माणूस” अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प यांची संभावना केली.
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्यानंतर ट्रम्प यांनी त्या देशाच्या नेतृत्वाला इशारा दिला होता. “जगाने आतापर्यंत न पाहिलेली आग आणि तांडव पाहायला मिळाले,” असे त्यांनी म्हटले होते.
आरटीएल या अन्य एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शुल्झ म्हणाले, “एक अमेरिकी अध्यक्ष उत्तर कोरियाच्या हुकूमशहाच्या पातळीपर्यंत अधःपतित होतो, याची मला चिंता वाटत आहे.”
यापूर्वी ट्रम्प यांच्यावर टीका करताना “ट्रम्प हे त्यांच्या देशाला व बाकी जगाकरिताही धोका आहेत,” असे मत शुल्झ यांनी व्यक्त केले होते.

Post a Comment

 
Top